Uncategorizedनांदेड

विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेस ग्रामस्थांनी सहकार्य करावे- मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील

नांदेड, दि. ८- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी मंगळवार दिनांक ७ जुलै रोजी लोहा तालुक्यातील धावरी व पिंपळगाव ढगे या गावांना भेट देऊन विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या गणना पत्रके भरण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या गृहभेटींचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
ग्रामस्थांशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील म्हणाले की, मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे गणना पत्रके भरण्यासाठी गृहभेटी देणाऱ्या बूथस्तरीय अधिकाऱ्यांना नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करून आवश्यक ती अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक पात्र नागरिकाने जबाबदारीची जाणीव ठेवून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
गावातील युवकांनीही या मोहिमेत पुढाकार घेऊन बूथस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. विशेषतः एकाच समाजाची किंवा समान आडनावांची कुटुंबे मोठ्या प्रमाणात असलेल्या गावांमध्ये २० ते २५ युवकांचे स्वयंसेवक गट तयार करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. या गटामार्फत गृहभेटी घेऊन नागरिकांना मोहिमेची माहिती देणे, भरलेली गणना पत्रके विहित मुदतीत संकलित करणे तसेच त्यांची ऑनलाइन नोंदणी वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सुरू असलेल्या घरकुल बांधकामांचीही पाहणी केली. लाभार्थ्यांशी संवाद साधून कामाच्या प्रगतीची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, गट विकास अधिकारी कुलकर्णी, नायब तहसीलदार संदीप हडगे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!