नाना-नानी पार्क गेले उडतं ; 18 लाख 95 हजार निधीचा अपहार , कोटयवधीची जागा व्यापाऱ्याच्या घशात ; पालिका हताश !


देगलूर : वृद्धासाठी असणाऱ्या नाना – नानी पार्क ची उभारणी करण्यासाठी शहरातील जागा नियोजित करण्यात आली. त्यासाठी 18 लाख 95 हजाराचा निधी पण आला. परंतु पैशाला हपापलेल्या अधिकारी आणि राजकिय प्रस्थांनी नाना – नानी पार्क गेले उडत म्हणत आलेल्या निधीचा अपहार करून ही नियोजित जागा आयतीच एका व्यापाऱ्याच्या घशात घातली आहे. त्यामुळे नगर प्रशासन काय असते ? या विषयी नगरवासीय साशंक आहेत.
दरम्यान , पार्कचा लाखोचा निधी आला, पण त्या ठिकाणी काहीच न करता त्याचा निधी इतरत्र वळविला की , वाटण्यात गेला याविषयी काहीच सांगता येत नाही. पण ही जागा मोकळी ठेवल्याने त्या जागेवर व्यापाऱ्याने अतिक्रमण करून आपली चारचाकी वाहणे थांबवित असून या जागी अक्षरशः डुकरे लोळत असल्याचे चित्र पहावयास मिळते.
देगलूर शहरातील वृद्ध लोकांना सोयीचे आणि त्यांच्या आरोग्यास हितकारक असलेली नाना – नानी पार्क संकल्पना अंमलात आणण्यासाठी बक्कळ निधी आला. यासाठी जागा ही ठरविण्यात आली . परंतु येथील बोगस नगरपालिका प्रशासन व तत्कालिन मुख्याधिकारी तथा येथील राजकीय व्यक्ती व नगराध्यक्ष नगरसेवक यांनी या निधीचा अपहार करून या ठिकाणी काहीच केले नाहीत .
आरक्षित असलेल्या पिरोजदीन टॉकीज परिसरातील मागच्या बाजूच्या जागेवर नाना-नानी पार्कच्या कामासाठीमंजुरीही देण्यात आली होती परंतु ती थांबविण्यात येऊन ती जागा तशी सोडून देण्यात आली त्यामुळे या जागेवर एका धनाढ्य व्यापाऱ्याने अतिक्रमण करून केवळ आपले वाहने थांबविण्यासाठी ही जागा आपल्या मालकीची आहे असे दर्शविले प्रकरण एवढ्यावरच थांबले नसून बाकीची उरलेल्या जागेवरही त्याच्या शेजारील नागरिकांनी परत अतिक्रमण करून ही जागा आमचीच आहेत असे भासवीत असल्याचे दिसून येते.
शिवाय या जागेवर घरातील सांडपाणी सोडले असल्यामुळे या ठिकाणी कचराकुंडी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून सर्वत्र चिखल झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी डुकरांचा सुळसुळाट झाला असून या पार्कच्या जागी अक्षरशः डुकरे लोळत आहेत .
त्यामुळे वृद्ध नागरिकांच्या आरोग्यासाठी व त्यांच्या हितासाठी असलेल्या या जागेवरील आरक्षित नाना नानी पार्क नगरपालिका प्रशासन आणि राजकीय व्यक्तींच्या साक्षीनेच चोरीला गेले की काय अशा समज येथील वृद्धांना होत आहे .त्यामुळे देगलूर शहरातील नगरपालिका प्रशासन तथा तत्कालीन राजकीय व्यक्ती नगराध्यक्ष नगरसेवक यांची सखोल चर्चा सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी अशी मागणी वृद्धांतर्फे करण्यात येणार आहे.
