प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांनी नांदेडच्या कृषी क्षेत्राचे नेतृत्व करावे : जिल्हाधिकारी कर्डिले


• जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे थाटात उद् घाटन • नांदेडकरांना धान्य खरेदीचे आवाहन
नांदेड : जिल्ह्यातील 80 टक्के नागरिक शेतीवर आधारीत अर्थव्यवस्थेशी जुळले आहेत. मात्र कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, जलसंधारण, कृषी यांत्रिकीकरण सर्वच क्षेत्रात आम्हाला सुधारण्यास वाव आहे. त्यामुळे ज्यांनी सेंद्रियशेतीपासून शेतीवर आधारीत अर्थव्यवस्थेत प्रगती केली आहे त्या प्रथीतयश शेतकऱ्यांनी नांदेडच्या कृषीक्षेत्राचे नेतृत्व करावे. कृषी विभाग त्यांना पाठबळ देईल, अशा आश्वासक शब्दात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रगतीशील शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या विकासात पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा आणि नांदेड येथील रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथे 17 व 18 मार्च दोन दिवस हा महोत्सव सुरू असणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते या कृषी, माती, शेती व यासंदर्भातील तंत्रज्ञानाला जोडल्या गेलेल्या या कृषी महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी 29 वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी शेतकऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला. या शेतकऱ्यांनी कृषीक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून अवघ्या काही गुंठे शेतामध्ये लक्षावधीचे उत्पादन घेतले आहे. या सर्व शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग लोकांपर्यंत पोहोचावे व त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकाऱ्यांनी काही मोजकी उदाहरणे दिली. ते म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जितके दुध उत्पादन होते तेवढे उत्पादन आपल्या अनेक जिल्ह्यांचे मिळून होत नाही. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, समूहशेती, आयात-निर्यात निगडीत शेती यासंदर्भात अनेक चांगले प्रयोग जिल्ह्यात झाले पाहिजेत. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये याठिकाणावरून ज्ञान घेऊन जा. त्यानंतर त्याबाबतीत प्रयोग करा. कृषीक्षेत्र प्रयोगशील लोकांना भरभरून परतफेड करणारे क्षेत्र आहे.
कर्मचारी-नागरिकांनी भेट द्यावी
यावेळी त्यांनी नांदेड महानगरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील या जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमध्ये तयार झालेले धान्य तसेच भाजीपाला व विविध वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी आवर्जून नवीन मोंढा येथील महोत्सवाला भेट द्यावी व मोठ्याप्रमाणात खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
29 प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार
आज जिल्हा कृषी व धान्य महोत्सवामध्ये 29 प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नांदुसा येथील खिरबाजी नागोराव कंगारे, भोसी येथील नंदकिशोर दिगांबर गायकवाड, दापशेड येथील विश्वनाथ गोविंदराव होळगे, सायाळ येथील रत्नाकर ढगे, मालेगाव येथील भगवान इंगोले, धारापूर येथील सदानंद ढगे, सोनवाडी येथील वनिता श्रीराम फोले, रेणापूर येथील सुनिता अशोक कावळे, धामदरी येथील गंगाबाई शामराव कदम, हिमायतनगर येथील गजानन प्रकाश तुप्तेवार, बारड येथील बालाजी मारोती उपवार, लगळूद येथील योगेश पोताजी टाकळे, कामठा बु येथील महानंदा केशवराव कल्याणकर, बोधडी येथील अभिजीत प्रभाकर जमादार, बनचिंचोली येथील बळवंत देवराव पौळ, सुजनवाडी येथील कृष्णा माधवराव भालेराव, हुंडा येथील श्रीधर शंकर गुंजकर, बितनाळ येथील गंगाधार दत्ताराम मुकदमे, नायगाव तालुक्यातील दिलीप शेळगावे, मांजरम येथील गणपती आनंदराव शिवारेड्डी, कासराळी येथील बसवंत शंकरराव कसराळीकर, बाळापूर येथील रविंद्र मलकन्ना पोतगंटीवार, मनाठा येथील संजय पांडुरंग सुर्यवंशी, साप्ती येथील कबिरदास कदम, कलंबर येथील मोहन विठ्ठल सोरगे, मनाठा येथील संतोष पांडुरंग सुर्यवंशी, चैनपूर येथील माधव शंकरराव पाटील, कुडली येथील सुनिल नामदेव चिमणपाडे, मालेगाव येथील अमोल बालाजी सावंत या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी यावेळी या प्रगतीशील शेतकऱ्यांच्या कार्यकर्तुत्वाला जाणून घेतले.
यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय पतंगे, रोटरी क्लबचे सचिव सुरेश अंबुलगेकर, जिल्हा समन्वयक डॉ. सुरेश साबू, कृषी विकास अधिकारी निलकुमार ऐतवाडे, सहायक प्रांतपाल मुरलीधर भुतडा, केदार साळुंके, सत्यजित भोसले, निलेश देशमुख बारडकर, डॉ. देविकांत देशमुख, कृषी उपसंचालक एच. एम. नागरगोजे, उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, बिलवल गिते, अनिल शिरफुले आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी केले.
एकदा अवश्य भेट द्या
जिल्हा कृषी व धान्य महोत्सवात उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करण्यात येते. याठिकाणी स्थानिक गुळ, भाजीपाला, विविध दाळी, फळे, ऊस, ज्यूस, महिला बचतगटांचे स्टॉल, वनऔषधी, लाकडी घाणा तेल याशिवाय सेंद्रीय शेतीत पिकविण्यात आलेली गहू, ज्वारी, तूर, मुग, उडीद, हरभरा दाळ, मध, डिंक, सेंद्रिय टरबूज, खरबूज याशिवाय नित्य उपयोगी जीवनावश्यक वस्तूंचे 82 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे असणारे हे स्टॉल विक्रीसाठी नांदेडकरांची वाट बघत असल्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद
दुसऱ्या सत्रामध्ये याच व्यासपीठावरुन शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती व पीक व्यवस्थापन, डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, श्री. हर्षल जैन यांनी सेंद्रिय शेती प्रमाणिकरण कार्यपध्दती, सुदाम शिरोळे यांनी कार्बन क्रेडिट संकल्पना व भविष्यातील संधी, दिनकर पाटील यांनी मधूमक्षिका पालन काळाची गरज, डॉ. अनंत लाड यांनी हवामान बदल आणि एकात्मिक किड व्यवस्थापन याविषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी तंत्र अधिकारी जाधव के एम , प्रमोद गायके ,संदीप स्वामी, कृषी अधिकारी सुनील सानप, कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण हांडे, तंत्र व्यवस्थापक सोहेल सय्यद आदींनी परिश्रम घेतले.
