कृषिनांदेडशहर

कर्जमुक्ती योजनेत पारदर्शक कार्यपद्धती ; शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा

नांदेड : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जातून दिलासा मिळणार असून, योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे.

या योजनेची संपूर्ण कार्यपद्धती सुलभ, सोपी आणि पूर्णपणे पारदर्शक असून, शेतकऱ्यांनी कोणत्याही मध्यस्थ अथवा दलालांच्या संपर्कात न राहता, ज्या बँक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कृषी पतसंस्था किंवा सहकारी बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्या संस्थेशी थेट संपर्क साधावा.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित बँकेतील आपल्या कर्ज खात्याची माहिती अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी. कर्ज खाते क्रमांक, कर्जाची रक्कम, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते आणि इतर तपशील अचूक असणे आवश्यक आहे. संबंधित संस्थेने मागणी केल्यानुसार आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर केल्यास पुढील प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे.

यासाठी आधार कार्ड, आधारशी संलग्न बँक खाते, बँक पासबुक, कर्ज खात्याचा तपशील, सातबारा (७/१२), ॲग्रीस्टॅक नोंदणीची माहिती, ई-केवायसी विशेषतः आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी या दोन बाबी महत्वाच्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि कोणत्याही अफवा, दिशाभूल करणारे संदेश किंवा अवैध दाव्यांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या कर्जमुक्ती प्रक्रियेबाबत नियमितपणे संबंधित बँकेशी संपर्क ठेवावा. आवश्यक कागदपत्रे केवळ अधिकृत संस्थेकडेच जमा करावीत. कोणत्याही अनोळखी व्यक्ती, एजंट किंवा दलालाकडे वैयक्तिक माहिती अथवा कागदपत्रे देऊ नयेत. शासन, संबंधित बँका, कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन केल्यास कर्जमुक्तीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शकपणे पूर्ण होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!