
नांदेड : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत (MY Bharat) केंद्र, नांदेड यांच्या वतीने भारताचे महान राष्ट्रचिंतक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सहआयोजन सलगरे फिजिक्स क्लासेस, नांदेड यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. महेश टेकाळे हे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा युवा अधिकारी अश्नी कानकाटे तसेच प्रसिद्ध लेखिका व कवयित्री प्रा. सारिका बकवाड उपस्थित होत्या.

यावेळी प्रा. सारिका बकवाड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, मूल्याधिष्ठित जीवन, संस्कारांची जपणूक, व्यक्तिमत्त्व विकास आणि ध्येयपूर्तीसाठी सातत्यपूर्ण परिश्रम याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “शिक्षण, संस्कार जीवनसमृद्धीचे आधारस्तंभ आहेत. ज्ञानासोबत चारित्र्य, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची जोपासना केल्यासच यशस्वी व जबाबदार नागरिक घडतात,” असे त्या म्हणाल्या.
त्यानंतर मान्यवरांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रसेवेचा आदर्श आणि युवकांच्या राष्ट्रनिर्मितीतील भूमिकेवर मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थी व युवक-युवतींनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


