
नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक व विभागप्रमुख, आदरणीय डॉ. श्याम वाकोडे यांनी सुमारे 35 वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि रुग्णसेवेने समृद्ध अशा कारकिर्दीनंतर सेवा पूर्ण केली. त्यांच्या या सेवापूर्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.
किशन फोले उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती
सन 1980 मध्ये एमबीबीएस आणि 1990 मध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1991 मध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे व्याख्याता म्हणून सेवेला प्रारंभ केला. 17 नोव्हेंबर 2008 रोजी त्यांची प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून पदोन्नती झाली. याशिवाय त्यांनी अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार तब्बल 11 महिने यशस्वीपणे सांभाळत आपल्या प्रशासकीय क्षमतेचाही ठसा उमटविला.

वैद्यकीय सेवेदरम्यान अनेक आव्हाने आणि कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरीही रुग्ण हेच माझे दैवत ही भावना जपत त्यांनी कधीही आपल्या कर्तव्याशी तडजोड केली नाही. लाखो गरोदर माता आणि नवजात बालकांना सुरक्षित आरोग्यसेवा देत त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.
डॉ. वाकोडे यांनी केवळ रुग्णसेवाच केली नाही, तर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. विद्यापीठ तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या परीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. निदान शिबिरे, रक्तदान शिबिरे, सामाजिक उपक्रम, तसेच खेडोपाड्यातून आलेल्या गरजू रुग्णांना योग्य मार्गदर्शन आणि वेळप्रसंगी वैयक्तिक मदत करून त्यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी कायम जपली.
आज, दिनांक 12 जुलै 2026 रोजी मेडिकल असोसिएशन व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोजित सेवापूर्ती सत्कार सोहळ्यास मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा.



