
कापड दुकान कामगार संघटणेपुढे मालकाची शरणागती,अखेर लाचार मालकाने सर्वांना परत बोलावले ! , शहरातील विजया -अनुप कापड दुकानातील प्रकार
PRAJASHILP digital देगलूर :- जरासा उशीर झाला म्हणून कापड शोरूम दुकान मालकाने एका कामगाराला थेट कामावरून परत पाठवल्याची घटना तळगल्ली येथील विजया अनूप कपड्याच्या दुकानात घडली. मालकाच्या या मनमानी आणि अन्यायकारक भूमिकेविरोधात दुकानातील सर्व कामगारांनी एकत्र येत तात्काळ काम बंद केले आणि दुकानाबाहेर जात कापड दुकान कामगार संघटणेची ताकद दाखवली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कपड्याच्या दुकानात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आज काही अपरिहार्य कारणामुळे कामावर येण्यास जरासा उशीर झाला. यावरून दुकान मालकाने संतप्त होत सर्वांसमक्ष त्या कामगाराचा अपमान केला आणि त्याला तात्काळ दुकानाबाहेर काढून टाकले.
मालकाच्या या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी दुकानातील इतर सर्व महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. “आज एकावर अन्याय झाला, उद्या आमच्यावरही होईल,” अशी भूमिका घेत सर्व कामगारांनी दुकानातील काम थांबवले आणि ते दुकानाबाहेर पडले. सर्व कर्मचारी दुकानाच्या बाहेर जमा झाल्याने परिसरात एकच गर्दी झाली होती.
”आम्ही अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत आहोत. कधीतरी पाच- आठ मिनिटे उशीर होणे स्वाभाविक आहे. त्यासाठी थेट नोकरीवरून काढून टाकणे हा अन्याय आहे. सणा – सुदीच्या काळात आम्ही 16 ते 18 तास का सतत काम करीत असतो”— संतप्त कर्मचारी
या आंदोलनामुळे भर बाजारातील कपड्याच्या दुकानाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. दरम्यान, मालकाने आपली चूक मान्य करून संबंधित कामगाराला परत कामावर घेतले, या घटनेमुळे बाजारपेठेतील कामगारांच्या सुरक्षेचा आणि मालकांच्या वर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. श्रमिक कामगार कायदा नुसार शहरातील सर्व कामगारांना सोयी – सुविधा भत्ते व पगार देण्यात यावे अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात मालक कामगाराकडून 18 ते 20 तास काम करून घेतात यासाठी जेमतेम पगार देतात पण तेच सीजन संपल्यानंतर या कामगारांना अपमानास्पद वागणूक तथा दुजाभाव केला जातो सीझनच्या वेळी मात्र या कामगारांना आपल्या मनाजोगे काम करून घेतात त्यामुळे कामगाराच्या संघटनेतमार्फत कामगार कायद्यानुसार वर्तणूक देण्यात यावी अशी मागणीही कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे .


