Prajashilp digital,
देगलूर : कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले देगलूर पोलीस सध्या आपल्या 'बनावट' आणि 'आकड्यांचा फुगवटा' करणाऱ्या कामगिरीमुळे शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत. जुगार अड्ड्यांवर छापे टाकताना अवघ्या ७ ते ८ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करायची, मात्र कारवाईचा आकडा मोठा दिसावा यासाठी जुगाऱ्यांचे मोबाईल आणि मोटारसायकली जप्त करून पोलीस दप्तरी चक्क ५ ते ६ लाखांचा मुद्देमाल पकडल्याचा गाजावाजा केला जात आहे. पोलिसांच्या या 'आकड्यांच्या खेळामुळे' मूळ गुन्हेगारांवर जरब बसण्याऐवजी सामान्य नागरिकांमध्ये मात्र पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
शहरासह ग्रामीण भागात अवैध धंदे आणि जुगार जोरात सुरू असल्याची चर्चा आहे. यावर कारवाई केल्याचे दाखवण्यासाठी पोलिसांकडून ८ ते ९ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले जाते. प्रत्यक्ष घटनास्थळावरून जप्त होणारी रोख रक्कम ही जेमतेम ७ ते ८ हजार रुपयांच्या घरात असते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांची शाबासकी मिळवण्यासाठी आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये मोठी बातमी झळकावी यासाठी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत फुगवून सांगितली जाते.
यामध्ये ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडील महागडे मोबाईल फोन आणि तिथे उभ्या असलेल्या दुचाकी गाड्यांची किंमत जोडून हा आकडा थेट ५ ते ६ लाखांपर्यंत नेला जातो. प्रत्यक्षात जुगारात लागलेली रक्कम किरकोळ असतानाही, वाहने आणि मोबाईलच्या किमतीमुळे ही कारवाई एखाद्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यासारखी भासवली जाते.
मोठ्या माशांना अभय का? किरकोळ जुगाऱ्यांवर कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल दाखवणाऱ्या पोलिसांना शहरात राजरोसपणे चालणारे मोठे अवैध धंदे दिसत नाहीत का?
प्रसिद्धीचा हव्यास कशासाठी? केवळ कागदोपत्री मोठी आकडेवारी दाखवून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवल्याचा आव आणला जात आहे का?
गाडी आणि मोबाईल ची जप्ती कशासाठी ? प्रत्यक्षात जुगार खेळताना खिशातील पैसे आणि जुगारावर लागलेले पैसे जप्त केल्या जाते पण , या ठिकाणी त्या व्यक्तीकडून साधारण 40 ते 50 हजार रुपयांचे मोबाईल आणि लाख - दीड लाख रुपयांची गाडी जप्त करतात. ती जप्त केलेली गाडी व मोबाईल मिळवण्यासाठी आरोपींना किंवा नातेवाईकांना अधिकचा पैसा पोलिसांना द्यावा लागत असल्याचे ही सांगण्यात आली आहे .
वरिष्ठ अधिकारी दखल घेणार का? पोलिसांच्या या बनावटी आकडेवारीची आणि कार्यपद्धतीची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का, असा सवाल देगलूरकरांकडून उपस्थित केला जात आहे.
एकंदरीत, देगलूर पोलिसांची ही 'लहान कारवाई, मोठा गाजावाजा' करण्याची पद्धत सध्या सर्वत्र टीकेचा विषय बनली असून, पोलिसांनी आकड्यांचा खेळ थांबवून खऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे