Prajashilp digital,
देगलूर : अंध विद्यालयातील अंध मुलीच्या वादग्रस्त मृत्यु नंतर शासकीय नियमांनुसार खात्यांतर्गत चौकशी किंवा गंभीर आरोपांमुळे मुख्याध्यापकाचे निलंबन झाले, तर त्याला संबंधित कार्यालयात किंवा शाळेत प्रवेश करण्यास मनाई असते. मात्र, प्रशासनाच्या या आदेशाला पायदळी तुडवत निलंबन होऊनही एक मुख्याध्यापक बिनदिक्कत शाळेत हजेरी लावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. "माझे कोणीच काही बिघडवू शकत नाही," अशा आविर्भावात वावरणाऱ्या या मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारामुळे शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
संबंधित मुख्याध्यापकावर कर्तव्यात कसूर करणे, आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमितता व अंध मुलीचे वादग्रस्त मृत्यू यांसारखे गंभीर आरोप सिद्ध झाल्यामुळे शिक्षण विभागाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. नियमानुसार निलंबित कालावधीत संबंधित व्यक्तीने मुख्यालयाची परवानगी न घेता किंवा परस्पर कार्यस्थळी उपस्थित राहणे बेकायदेशीर आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी शासनाचे आदेश होते की ज्या संस्थेत किंवा कर्मचारी, अधिकार्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे.त्यांना शाळेत येण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे शिवाय संस्थेच्या अध्यक्षांना सुद्धा शाळेत प्रवेश करता येत नाही . त्यामुळे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या मुख्याध्यापकाने तोंड वर करून शाळेत येणे हे एक प्रकारे कायद्याला आव्हानच ठरले आहे !
मात्र, येथे चित्र उलटेच पाहायला मिळत आहे. निलंबनाचे आदेश मिळूनही हे महाशय शाळेत पोहोचतात, मुख्याध्यापकांच्या खुर्चीत बसण्याचा प्रयत्न व सेवक कर्मचाऱ्या हुकूम सोडतात आणि कामकाजात थेट हस्तक्षेप करतात.
निलंबित मुख्याध्यापकाच्या या बेकायदेशीर वावरामुळे शाळेतील इतर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिक्षकांवर दबाव: तात्पुरता पदभार घेतलेल्या प्रभारी मुख्याध्यापकाला काम करू न देणे आणि सहकाऱ्यांवर मानसिक दबाव आणणे सुरू आहे.
दस्तऐवजांशी छेडछाड करण्याची भीती: शाळेतील महत्त्वाची कागदपत्रे, हजेरी पट आणि आर्थिक व्यवहारांच्या फाईल्स निलंबित मुख्याध्यापकाच्या हाती असल्याने पुराव्यांशी छेडछाड होण्याची दाट शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे.एका बाजूला शासन शिस्तीचे धडे देते, तर दुसरीकडे निलंबनानंतरही शाळेत येऊन ठाण मांडणाऱ्या मुख्याध्यापकावर संबंधीत विभाग व पोलिस कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. यामुळे "या निलंबित मुख्याध्यापकाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच व पोलिसांचा आशीर्वाद आहे का?" असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. तक्रारी करूनही शिक्षण विभाग डोळे झाकून बसल्याने पालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे, तेथे अशा गैरप्रकारांना आणि बेकायदेशीर हस्तक्षेपाला स्थान असता कामा नये. शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित निलंबित मुख्याध्यापकाला तात्काळ शाळेच्या आवारातून बाहेर ठेवावे आणि त्याच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी पालकांकडून केली जात आहे.

