Prajashilp digital ,
देगलूरःशासकीय योजनेअंतर्गत रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांची मोठी थकबाकी दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने क्रष्णा डायग्नोस्टिक्स लिमिटेडने मोफत तसेच शासनाकडून संदर्भित ‘क्रेडिट’ सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीने रुग्णांसाठी सूचना प्रसिद्ध केली आहे.
दरम्यान, येथील नगर सेवकां पासून ते आमदार खासदारांपर्यत राजकिय प्रभृतींनी आम्ही तालूक्यातील व शहरातील नागरीकांसाठी आमकी - ढमकी योजना आणली असे ऊर बडवून सांगतले. असे असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून शासकिय रुग्णालयातील सी.टी स्कॅन बंद आहे ते चालू करण्यासाठी कोणताच प्रयत्न होत असल्याचे दिसून येत नाही.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, शासकीय योजनेंतर्गत सेवा सातत्याने सुरू ठेवण्यात आल्या; मात्र संबंधित सेवांची मोठी रक्कम अद्याप मिळालेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका, प्रत्यक्ष भेटी आणि लेखी पत्रव्यवहार करूनही थकबाकीचा प्रश्न निकाली निघालेला नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.
“आधी दिलेल्या सेवांची मोठी थकबाकी दीर्घकाळ प्रलंबित असताना अनिश्चित काळापर्यंत सेवा सुरू ठेवण्याची अपेक्षा करणे योग्य नाही,” अशी स्पष्ट भूमिका कंपनीने घेतली आहे. या आर्थिक परिस्थितीचा परिणाम अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, रुग्णसेवा पूर्णपणे बंद न करता कंपनीने काही सवलत कायम ठेवली आहे. आपत्कालीन आणि अपघातग्रस्त रुग्णांना क्रेडिटवर सेवा सुरू राहणार असून, इतर रुग्णांना लागू निविदा दरानुसार शुल्क भरून तपासणी सेवा घेता येणार आहे.
थकबाकीचा प्रश्न लवकर निकाली निघून नियमित सेवा पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.
आता प्रश्न एवढाच की, शासकीय योजनेंतर्गत सेवा देणाऱ्या संस्थांची प्रलंबित देणी नेमकी किती आहेत आणि ती कधीपर्यंत अदा केली जाणार? थकबाकीमुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची वेळ येत असेल, तर संबंधित यंत्रणेने याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे.

