Prajashilp digital,
देगलूरः शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तहसील आणि पंचायत समिती कार्यालयाच्या अगदी लगत असलेल्या पंचायत समिती सभापतींच्या शासकीय निवासस्थानाची सध्या कमालीची दुरावस्था झाली असून, हे निवासस्थान चक्क 'कोंबड्यांचा खुराडा' बनले आहे. शासकीय निवासस्थानात थेट कोंबड्या पाळल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने, या कोंबड्या नेमक्या पाळण्यासाठी ठेवल्या आहेत की कापून खाण्यासाठी, अशी घमघमीत आणि चवीची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात रंगली आहे.
दरम्यान, या प्रकाराविषयी बीडीओ साहेबांना याची पुसटशीही कल्पना सुद्धा नाही.त्यामुळे बी.डि.ओ. साहेबांच्या अशा या दुर्लक्षित जबाबदारीमुळे शासकीय इमारतीची दुरवस्था होत आहे.शिवाय या परिसरात गवत अत्यंत वाढले असून जागोजागी कचरा आणि घान पसरली आहे . याकडे कोण लक्ष देईलअसा प्रश्न पडला आहे.
जनतेचे प्रश्न सुटावेत, ग्रामीण भागाच्या विकासाचे नियोजन व्हावे आणि शासकीय कामकाज सुरळीत चालावे यासाठी लाखो रुपये खर्चून सभापतींसाठी हे निवासस्थान बांधण्यात आले आहे. मात्र, प्रशासकीय कामांचा गाडा हाकण्याऐवजी या शासकीय जागेचा वापर चक्क कुक्कुटपालनासाठी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तहसील व पंचायत समितीसारख्या गजबजलेल्या शासकीय आवारातच हा प्रकार घडत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
निवासस्थानाच्या आवारात फिरणाऱ्या कोंबड्यांमुळे शासकीय जागेची प्रतिष्ठा तर धुळीस मिळाली आहेच, शिवाय "पंचायत समितीच्या जबाबदार अधिकारी आणि महोदयांना कुक्कुटपालनाचा नवा छंद जडला आहे की, मांसाहाराची सोय म्हणून हा खुराडा थाटला आहे?" असे खोचक सवाल सामान्य जनतेतून विचारले जात आहेत.
शासकीय मालमत्तेचा असा गैरवापर होत असताना संबंधित प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शासकीय निवासस्थानाची झालेली ही 'कोंबडा शाळा' त्वरित बंद करून या जागेचे गांभीर्य जपले जाईल का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
